भुकेल्यांना धान्यपुरवठा करण्यासाठी चार संस्थांचे एकत्रित प्रयत्न यशस्वी.
गरजेच्या वेळी केवळ एका फोनच्या अंतरावर मदत उपलब्ध असते', हे अक्षरशः खरे असल्याचे नुकतेच सिद्ध झाले. विवेकानंद सेवा मंडळाच्या (विसेमं) एका कार्यकर्त्याला आलेल्या एका फोनवर, "20 कुटुबांतील 124 व्यक्तींना अन्नधान्याची गरज असल्याचे" विक्रोळीतील 'सहकारी धान्य पेढी'च्या कार्यकर्त्याकडून कळले, व मंडळाने (विसेमं) हे आह्वान ताबडतोब स्वीकारले. पाठोपाठ, आणखी दोन समविचारी संस्था या कामाच्या पाठीशी उभ्या राहिल्या. 'शिवाजी महाराज अमेरिका परिवार फाउंडेशन' ने उदारपणे निधीपुरवठा केला, तर 'रा.स्व.संघाच्या जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत)', या संस्थेने सदर प्रक्रियेत सहभाग घेतला.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षिका व त्यांच्या मित्रपरिवाराने, सहकारी धान्य पेढी ही संस्था, गरजू व्यक्तींच्या कल्याणासाठी स्थापन केली आहे. सद्यस्थितीत, गरजू/ लाभार्थी हेरून त्यांची माहिती गोळा करणे, धान्याची पाकिटे तयार करणे व लॉकडाउनच्या नियमांचे पालन करत ती वितरित करणे, या प्रत्यक्ष क्षेत्रातील जबाबदाऱ्या ही संस्था पार पाडत आहे.
दाट लोकवस्तीच्या भागातून 124 व्यक्तींची माहिती गोळा करणे अजिबात सोपे नव्हते. 'पूर्वतयारी करताना शांतपणा मात्र अंमलात आणताना धाडस, हीच संकटसमयी काम करण्याची गुरुकिल्ली' असल्याची शिकवण, थोर स्वातंत्र्यसेनानी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी दिली आहे. तिचेच स्मरण करून या 20 गरजू कुटुंबांना आधार देण्यासाठी, आम्ही पद्धतशीर काम सुरू केले.
सहकारी धान्य पेढीने या व्यक्तींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केल्यावर, 'इच्छा असेल तर मार्ग दिसेल' या उक्तीचे प्रत्यंतर आले. आर्थिक आह्वान अर्थातच मोठे होते. आमच्या 'विसेमं'च्या एका अमेरिकास्थित कार्यकर्त्याने, जो वरील 'शिवाजी महाराज अमेरिका परिवार फाउंडेशन'चा संस्थापक आहे, त्याने या कुटुंबांसाठी धान्यखरेदी करण्यासाठी निधीपुरवठा करण्यास मान्यता दिली.
आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे, आम्ही ज्या दुकानातून धान्यखरेदी केली त्या दुकानदारानेदेखील या चांगल्या कामासाठी आम्हाला भरीव सवलत दिली. सध्याच्या काळात, व्यापारातील फायद्याची संधी म्हणून या व्यवहाराचा विचार न करता, 'मेसर्स जय योगेश्वर मसाला'च्या मालकाने स्वतःहून भावात चांगली सूट दिली, हे खरोखरच कौतुकास्पद उदाहरण ठरावे!
मदतीची गरज असल्याचे कळल्यापासून एका आठवड्यात ही सर्व कार्यवाही होऊन, या 124 व्यक्तींना त्यांच्या गरजेनुसार धान्यपुरवठा करून आम्ही हा पाठपुरावा यशस्वीरीत्या पूर्ण केला. सदर 20 कुटुंबांना एक महिन्यासाठी प्रत्येकी 18 किलो अन्नधान्य, 2 मे 2020 रोजी, सहकारी धान्यपेढीच्या कार्यकर्त्यांमार्फत वितरित करण्यात आले. आता, त्याच भागातून येणाऱ्या माहितीनुसार, एकत्रितपणे प्रयत्न करून, अन्य गरजूंपर्यंत आणखी मदत पोहोचविण्याचा निश्चय आम्ही सर्व संस्थांनी केला आहे.



