२००० हून अधिक गरजूंना मदतीचा हात: विवेकानंद सेवा मंडळाच्या वतीने 'गरजवंतांना अन्नधान्य' या परिवर्तनशील मोहीमेचा एक यशस्वी प्रवास !

  • समाजातील विविध गटांतील २०३० जण आज पर्यंत समाधानी
  • जवळपास ७० सेवाभावी कार्यकर्त्यांकडून प्रभावीपणे चालवली जाणारी कार्यप्रणाली
  • अनेक समविचारी संस्थांकडून साथ
  • जगभर पसरलेला दानशूरांचा समुदाय

डोंबिवली, १७ मे २०२०: या राष्ट्रीय स्थानबद्धधतेच्या काळात १३ एप्रिल २०२० रोजी रबाळे, नवी मुंबई येथील तिघांच्या कुटुंबाला अन्नधान्य आणि किराणाची मदत पोहचवून सुरू झालेल्या या सेवायज्ञात नंतर आम्ही मागे वळून पहिलेच नाही. अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत आपण तिघांपासून २०३० गरजू बांधवांपर्यंत तंत्रज्ञानाच्या मदतीने मदत पोहचविण्यात यशस्वी झालो आहोत.

Sevadan

गरजवंतांना अन्नधान्य' या मोहिमेअंतर्गत विवेकानंद सेवा मंडळाने २००० हून अधिक गरजवंतांना अन्नधान्य, किराणा, औषधे आणि दूध हे अत्यंत काटेकोर पद्धतीने आखलेल्या कार्यप्रणालीच्या आधारे वैयक्तिक सुरक्षित अंतराच्या सर्व नियमांचे पालन पाळून पोहोचते केले. आजपर्यंतच्या या प्रवासात अनेक आव्हानात्मक प्रसंगांना सामोरे जाताना निरपेक्ष भावनेने कार्य करण्याची जी शिकवण पुन्हा एकदा नव्याने समजली ती नक्कीच कार्यकर्ता म्हणून आम्हाला समृद्ध करणारी होती.

trend

गरजवंतांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा !

समाजातील वंचित आणि कष्टकरी, रोजंदारीवर काम करणाऱ्या बांधवांसाठी हा सहनशक्तीचा अंत पाहणारा काळ ठरला. या काळात आम्ही स्थलांतरीत कामगार, शहरी निराधार यांच्यापर्यंत मदत पोहचवू शकलो याचंच समाधान आहे. जीवन संवर्धन फाऊंडेशन आश्रमशाळे मार्फत पुनर्वसन करण्यात येणाऱ्या निराधार मुलांसोबतंच नंदादीप फाऊंडेशन तर्फे चालविण्यात येणाऱ्या अनाथालयातील मुलांपर्यंत आपण मदत पोहचविण्यात यशस्वी झालो आहोत (Click here to read this story ). अशीच मदत वडवली (डोंबिवली) गावांतील दिव्यांग (Click here to read this story ), गोव्यातील वेद पाठशाळेतील विद्यार्थी, आणि अतिदुर्गम भागातील आपल्या वनवासी बांधवांपर्यंत सुद्धा पोहचविण्यात आली.

गरजूंच्या मदतीसाठी वैयक्तिक सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करून राबविलेली कार्यप्रणाली !

याच प्रभावी कार्यप्रणालीच्या मदतीने एका कार्यकर्त्यास एका कुटुंबाची अवघ्या २-३ तासात मदत करणे सहज शक्य झाले. ७० हून अधिक कार्यकर्त्यांच्या गटाकडून आजवर आपण २४० हून अधिक वैयक्तिक व सामूहिक केसेस सोडवू शकलो आहोत.

समूह गटाची मदत करताना याहून थोडी आव्हानात्मक परिस्थिती असते. एका हून अधिक कुटुंबांच्या गरजा भागविताना तेवढ्या स्वरूपात किराणा आणि अन्य सामानाची जुळवाजुळव करताना वैयक्तिक सुरक्षित अंतराचे नियमांचे पालन करणे आवश्यक असते. अशा प्रसंगी संघ परिवाराचे स्वयंसेवक, विक्रोळी येथील सहकारी धान्य पेढीचे कार्यकर्ते आणि संघाच्या जन कल्याण समिती तसेच तसेच 'आध्यात्म विचार प्रबोधिनी सामाजिक सेवा समिती, पालघर' यांच्या मदतीने गरजूंपर्यंत प्रत्यक्ष भेट देऊन मदत पोहोचविण्यात येते. त्यामुळे समूह गटाच्या मदतीस २-५ दिवसांचा कालावधी लागतो.

Demographics

आता पर्यंत १० समूह गटांपर्यंत मदत पोहोचविण्यात मंडळ यशस्वी झाले आहे. त्यांचा तपशील खालीलप्रमाणे :

  1. १२९ मुले - नंदादीप फाऊंडेशन अनाथाश्रम, कोळसेवाडी(कल्याण) आणि जीवन संवर्धन फाऊंडेशन आश्रमशाळा, टिटवाळा
  2. ४४ आयटीआय शिकणारे विद्यार्थी - वसार (कल्याण)
  3. २६ दिव्यांग व्यक्ती - वडवली (डोंबिवली)
  4. २० कुटुंबातील १२४ जण - विक्रोळी
  5. २२ विद्यार्थी - वेदपाठशाला, गोवा
  6. ७० वनवासी कुटुंबं - पालघर
  7. १३२ व्यक्ती - विक्रोळी
  8. ४० व्यक्ती - सरळी गाव
  9. ४३ कुटुंबं - साईनाथ नगर
  10. २० कुटुंबं - उल्हासनगर

Geographical Footprint_English

अनेक समविचारी संस्थांची लाभली साथ !

या सेवादान कार्यात विविध समविचारी सेवाभावी संस्था यांची वेळोवेळी आम्हांस मदत झाली. 'सहकारी धान्य पेढी, विक्रोळी' यांनी विक्रोळी येथीलच १२४ गरजूंच्या समूह गटाच्या मदतीचे आवाहन आपल्याकडे वर्ग केले. हि मदत पोहोचविताना त्या समूह गटाची प्राथमिक स्वरूपाची सत्यता पडताळणी, माहिती संकलन आणि अन्नधान्य-किराणा मदत थैलींचे वाटप हे सर्व काही सहकारी धान्य पेढी यांनीच पुढाकार घेऊन पार पाडले. अमेरिकास्थित 'शिवाजी महाराज अमेरिका परिवार (SMAP)' यांनी ही मदत पोहोचविण्यासाठी अर्थसहाय्य केले. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - जनकल्याण समिती' यांचेही या प्रसंगी मोलाचे सहकार्य लाभले. पालघर येथील समूह गटास मदत करतेवेळी 'अध्यात्म विचार प्रबोधिनी सामाजिक सेवा समिती' यांचे अशाच प्रकारचे साहाय्य लाभले

जगातील कानाकोपऱ्यातून १५० हून अधिक दानशूर आश्रयदात्यांचे भरीव योगदान !

हा सेवादान यज्ञ चेतवत ठेवण्यात जगभरातील मंडळाच्या अनेक आश्रयदात्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा ह्या आश्रयदात्यांनी स्वतः तसेच आपल्या अनिवासी भारतीय मित्रांच्या सहकार्याने तसेच भारतातील त्यांच्या कुटुंबांच्या खात्यांच्या आधारे वेळोवेळी सढळ हस्ते मदत केली आहे.

तंत्रज्ञानाची मदत !

सामाजिक कार्य करताना तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्या कार्याची गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढविणे हा मंडळाच्या कार्याचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे. मंडळाची हि 'गरजवंतांना अन्नधान्य' मोहीमेमध्ये सुद्धा तंत्रज्ञानाने एक प्रमुख भूमिका बजावली आहे. या सेवादान कार्यात दानशूर व्यक्तींकडून देणगी मिळविणे आणि त्या देणगीद्वारे मदतकार्यामधील गरजूंच्या किराणा सामानाची दुकानदार/किराणा व्यापाऱ्यांची देणी भागविणे इथपर्यंतचे सर्व आर्थिक व्यवहार डिजिटल स्वरूपातच होतात. देणग्यांचे व्यवस्थापन, गरजूंची माहिती संकलित करून त्याचे व्यवस्थापन, सरकारी ओळखपत्रांची सत्यता पडताळणी, गरजूंच्या भौगोलिक स्थानाची सत्यता पडताळणी या सर्वांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक परिपूर्ण कार्यप्रणाली उभी केली

या सर्व आकडे, वृत्त यामधून कोरोना संकटातील गरजूंच्या निकडीच्या भीषण अवस्थेची आपणांस कल्पना येईल. आपले असंख्य बांधव आज मदतीच्या आशेच्या प्रतीक्षेत डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहेत. आणि या चेतविलेल्या सेवायज्ञामधून अशाच आपल्या त्या गरजू बांधवांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी विवेकानंद सेवा मंडळ सतत प्रयत्नशील आहे आणि पुढेही राहिल!


{{-- --}}