अस्मानी संकटाच्या दुहेरी फटक्याने सुधागड (रायगड जिल्हा) येथील वनवासी जमातींचे जीवन उध्वस्त !

विवेकानंद सेवा मंडळ आणि ट्रेकक्षितिज संस्थेचा मदतीचा हात !

रायगड, मे २४: कोविड-१९ च्या महामारीशी झगडा सुरू असतांनाच, महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळाच्या रूपाने अजून एका हल्ला झाला आणि सगळं जीवनमानच बदलून गेले. जेव्हा अख्ख जग चीन निर्मित कोरोना महामारीशी लढा देत असतांना सुधागड किल्ला परिसरातील (जिल्हा रायगड) सर्व वनवासी जमातींचे जीवन निसर्ग वादळाने पार उध्वस्त करून टाकले. अक्षरशः या संकट काळात त्यांच्या डोक्यावरील छप्परचं या वादळात उडून गेल्याने ह्या सर्वांना परिसरातील प्राथमिक शाळेचा आश्रय घ्यावा लागला. अगोदरच ही वस्ती कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या राष्ट्रीय स्थानबद्धतेमुळे आपल्या प्राथमिक गरजांसाठी झगडत असतांना, निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या घरांच्या पडझडीमुळे त्यांच्यावर दुःखाचा जणू डोंगरच कोसळला.

निसर्ग वादळाच्या प्रकोपा नंतर या भागात सर्वप्रथम पोहोचली ती विवेकानंद सेवा मंडळाची मित्र संस्था ट्रेकक्षितिज, जी ह्याच भागात गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. निसर्गप्रेमी, गिर्यारोहक आणि इतिहासप्रेमी तरुणांची ही ट्रेकक्षितिज संस्था या भागामधील गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके पुरविते सांस्कृतिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करते. या भागात संस्थेतर्फे वाचनालय सुरू करण्यात आले असून गरज पडल्यास वनवासी मुलांना प्रत्यक्ष शिकविण्याचेही कार्य ट्रेकक्षितिज ही संस्था करते. सुधागड परिसरात गिर्यारोहण उपक्रमाचे आयोजन करत असतानाच येथील किल्ल्यांच्या डागडुजीचे कार्य सुद्धा संस्थेतर्फे केले जाते. विवेकानंद सेवा मंडळ आणि ट्रेकक्षितिज यांचे जिव्हाळाचे संबंध असल्याने आम्ही एकत्र येऊन सुधागड परिसर असलेल्या गावातील १६४ वनवासी कुटुंबाना १५ दिवसांचा शिधा व किराणा सामानाची तात्काळ मदत करण्याचे ठरविले.

ट्रेकक्षितिज संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सुधागड भागातील प्रभावित भागाचे सर्वेक्षण केले आणि तातडीने येथील आदिवासी भागातील लोकांना मदतकार्य सुरू केले. विवेकानंद सेवा मंडळाकडून त्यांना शिधा आणि व्यक्तिगत स्वच्छतेच्या वस्तू उपलब्ध करून दिल्या गेल्या. मदतकार्याच्या सुरुवातीला अन्नधान्य आणि शिधा स्थानिक दुकानातून विकत घेऊन त्याचे शिक्षकांमार्फत गरजूंना वाटप करण्यात आले. (ज्यांची या उपक्रमासाठी देणगी द्यायची इच्छा आहे ते येथे देणगी देऊन त्यांचे तपशील देऊ शकतात.)

याआधीही गावकरी आणि ट्रेकक्षितिजकडून एकत्रितपणे सुधागड किल्ल्याच्या डागडुजीचे काम करण्यात आले. (छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राजगड ऐवजी राजधानीला पर्याय म्हणून या किल्ल्याचा विचार करण्यात आला होता. या किल्ल्यावर मंदिरे, पंत-सचिव वाडा, इत्यादी बऱ्याच वास्तू आहेत ज्यांना निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला.) सामाजिक आणि भावनिक बांधिलकीमधून ट्रेकक्षितिजने या मदतकार्यात उडी घेतली आणि या कार्यात विवेकानंद सेवा मंडळानेसुद्धा या दुहेरी आपत्तीचा फटका बसलेल्या गावकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी स्वीकारली.

राहुल मेश्राम, ट्रेकक्षितिजचे अध्यक्ष म्हणाले, "चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या भागाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. बरेच लोक कोविड-१९ मुळे दोन महिन्यांपासून कमावत नसल्याने आधी आम्ही अन्नधान्य, शिधावाटप करण्याचा निर्णय घेतला. आम्ही विवेकानंद सेवा मंडळासोबत कोरोना हंगर रिलीफ वर्क उपक्रमात सध्या काम करत असल्याने आणि त्यांच्याशी साधारण दोन दशकांपासून संबंध असल्याने या मदतकार्यासाठी विवेकानंद सेवा मंडळाचे नाव सर्वप्रथम आम्हाला सुचले."

गावकऱ्यांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी घरांना छते बांधण्याची गरज होती, त्यामुळे ट्रेकक्षितिजने निषाद गांधी यांच्या M/s Roofs and Ceilings Pvt. Ltd. संस्थेच्या सहाय्याने नुकसान झालेल्या घरांना लोखंडी पत्रे व प्लास्टिकची छते पुरवली.

ट्रेकक्षितिज आणि विवेकानंद सेवा मंडळातर्फे निसर्ग चक्रीवादळ आणि कोविड-१९ अश्या दुहेरी फटका बसलेल्या नागरिकांना होत असलेले मदतकार्य त्यांचे जनजीवन रुळावर येईपर्यंत सुरूच राहील.


{{-- --}}