विवेकानंद सेवा मंडळ परिवाराच्या 'अष्टलक्ष्मी' आराधनेद्वारे ५,००० हून अधिक गरजूंची मदत ! !

डोंबिवली, ४ जुलै २०२०: ५००० ही संख्या आमच्यासाठी केवळ एक आकडा नसून कोविड-१९ च्या संकटकाळात, केवळ ३ महिन्यांत गरजूंची सेवा करताना पार केलेला तो एक मैलाचा दगड आहे. या कठीण परिस्थितीत ज्यांनी आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी विवेकानंद सेवा मंडळास संपर्क केला, मंडळातर्फे त्या सर्वांची सेवा करण्यात आली. अगदी शहरी गरजू ते वनवासी बांधव, टाळेबंदीमुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांपासून अनाथाश्रमांपर्यंत, स्थलांतरीत कामगार वर्ग ते प्रेक्षागृहातील पडद्यामागील कलाकार, निराधार महिला ते अपंग पुरुष, वैदिक अभ्यासक ते मुस्लिम, ख्रिश्चन भारतीय नागरिक, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील गरजू ते गुजरात आणि मध्य प्रदेशातील काही शहरांमधील गरजू; या सर्व बांधवांपर्यंत मंडळाच्या सेवादान यज्ञामधून मदत पोहोचविण्यात आली.

इतिहासात घडलेल्या घटनांचा मागोवा घेणे येथे जास्त संयुक्तिक ठरेल. १८९८ साली भारतात आलेल्या प्लेगच्या महामारीसंदर्भात स्वामी विवेकानंदांनी प्लेग विषयीच्या जाहीरनाम्यात लिहिले होते: “चला, आपण या खोट्या भ्रांतीचा त्याग करू आणि देवाच्या असीम करुणेवर विश्वास ठेवून आपली कंबर कसून प्रत्यक्ष कार्यप्रवण होऊया. कृती करा. आपण शुद्ध व सात्त्विक जीवन जगूया. आजार, साथीच्या रोगाचे भय इ. भगवंतांच्या कृपेने समूळ नष्ट होईल."

१२२ वर्षांनंतरही स्वामीजींच्या दिव्य आणि प्रेरणादायक शब्दांचे सात्विक बळ मनी धारण करून मंडळाचे ८० हून अधिक कार्यकर्ते, कोरोना टास्क फोर्स, ट्रेकक्षितिज, विवेकवाडी परिवार, ध्रुव आयएएस अकादमी, सेवा सहयोग, दक्ष आणि आरएसएस जन कल्याण समिती सारख्या समविचारी संस्थांच्या ४० हून अधिक स्वयंसेवकांच्या साथीने, या सेवायज्ञात सहभागी झाले. अत्यंत कमी कालावधीत १५० हून अधिक उदार देणगीदारांच्या पाठबळामुळे मंडळाने कोविड-१९ महामारी काळात गरजूंना मदत करण्यासाठी एक प्रभावी कार्यप्रणाली उभी केली. प्रगत तंत्रज्ञानाच्या साथीने, प्रकल्प व्यवस्थापनासाठी मानक कार्यप्रणाली तयार करून, जरूर तिथे संघ (RSS) परिवाराची मदत घेऊन आणि सर्व शारीरिक अंतरांच्या निकषांचे पालन करून, गरजूंनी केलेल्या मागणीच्या दाव्याची पडताळणी करून हे सेवा कार्य पार पाडण्यात आले.

या सेवाकार्या मागील निस्वार्थ उद्देश विषद करताना विवेकानंद सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री.केतन बोंद्रे म्हणाले: “या संकट काळात गरजू बांधवांना मदत करण्यासाठीच केवळ आम्ही सर्वजण एकत्र आलेलो नसून, अष्टलक्ष्मी रूपातील आपल्या या भारतमातेची मनोभावे सेवा करण्यासही आम्हीं वचनबद्ध आहोत. ‘अष्टलक्ष्मी’ ही एक पवित्र आध्यात्मिक ऊर्जा मानली जाते ज्यामुळे सर्व प्राणिमात्रांचे अध्यात्मिक आणि भौतिक कल्याण होते. या महामारीरुपी सामाजिक आणि आर्थिक संकटात आपण आपल्या सेवाकार्याच्या विविध घटकांच्या माध्यमातून जाणते-अजाणतेपणाने देवीची उपासना करण्याचाच प्रयत्न केला आहे."

अष्टलक्ष्मीतील प्रथम रूप, ‘आदिलक्ष्मी’, देवीने गरजूंच्या साहाय्याकरीता दृढ निश्चयाने उभे राहण्यासाठी आम्हाला सामर्थ्य आणि चित्तशांती प्रदान केली. या सेवाकार्यात आम्ही दोन निवासी आश्रमशाळांमधील १२९ मुलांना मदत करून, ‘संतानलक्ष्मीच्या’ रूपात देवीची उपासना करण्यास सुरुवात केली. लवकरच ही वार्ता सर्वदूर पसरली आणि अनेक देणगीदारांनी ‘धनलक्ष्मीच्या’ रूपात या पवित्र कार्यास आर्थिक योगदान देण्यास सुरुवात केली.

या पैलूवर भाष्य करताना श्री. मुथुस्वामी चंद्रशेखरन, संस्थापक संचालक, स्पेशल मटेरियल अँड टेक्नॉलॉजीस, बेल्जियम आणि आमचे दीर्घकालीन पाठीराखे म्हणाले, “आदिशंकराचार्य भजगोविंदम् मध्ये म्हणतात, 'देयं दीनजनाय च वित्तम्’ किंवा ‘गरीब व गरजूंसाठी दान करा’. माझ्याजवळ दानधर्म करण्यासाठी आवश्यक धनसंपत्ती असेलही परंतु ज्यांना खरी गरज आहे अशा गरजूंना शोधून त्यांच्या पर्यंत ते दान पोहोचविण्यासाठी विवेकानंद सेवा मंडळा सारखी संस्था आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची आवश्यकता असते. आपल्याकडे केवळ देण्याचा विचार असून चालत नाही तर प्रत्यक्ष दान देण्यासाठी दातृत्वही असणं आवश्यक आहे. देणे सोपे आहे परंतु अंतःकरणा पासून ते दान दिल्यास सात्त्विक मनःशांती लाभते.”

कोविड-१९ महामारीच्या काळात जास्तीत जास्त गरजूंपर्यंत सेवा पोहोचविण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जी व्यवस्थापन कार्यप्रणाली उभी केली ती मंडळाच्या संस्थापकांकडून आत्मसात केलेल्या नियोजन आणि व्यवस्थापन कौशल्याच्या पायावर आधारीत होती. विद्यालक्ष्मी देवीची उपासना या हून वेगळी ती काय!

मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी हा आव्हानात्मक काळ होता कारण बहुतेक कार्यकर्ते टाळेबंदीमुळे घरूनच काम करत होते. कामाच्या प्रचंड ताण सहन करीत असतानाही, देवी ‘धैर्यलक्ष्मीने’ दिलेले धैर्य आणि कार्याप्रती समर्पण भाव हे सेवाकार्य यशस्वी करण्यास वरदानच ठरले. या सकारात्मक कार्याच्या प्रभावाने आणि ‘राजलक्ष्मीच्या’ पाठबळाने सर्वत्र नकारात्मक वातावरण असूनही कार्यकर्त्यांचे आत्मबल नेहमी वृद्धिंगतच होतं राहिले.

मंडळाने या सेवाकार्या दरम्यान स्वकार्याचे अनेक नवीन मापदंड ओलांडले. जसे की, कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचविणे किंवा एका सेवाकार्यात जास्तीत जास्त कार्यकर्त्यांची संख्या असणे किंवा एका सेवाकार्यासाठी सर्वात जास्त देणगी जमा करणे असेल किंवा सर्वात कमी कालावधीत एखाद्या सेवाकार्यावर झालेला सर्वाधिक खर्च असेल, हे सर्व शक्य झाले ते केवळ आणि केवळ ‘विजयलक्ष्मी’ मातेच्या कृपाशीर्वादानेच !

अशाप्रकारे, ५००० हून अधिक लाभार्थ्यांना ‘धान्यलक्ष्मी’ त्यांच्या गरजेच्या वेळी आणि जेवढ्या वेळा त्यांनी विनंती केल्या तिवेढ्या वेळा प्राप्त झाली. प्रेक्षागृहात पडद्यामागील रंगकर्मी असलेल्या लाभार्थ्यांपैकी एक आपली कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाली की, “मी विरारच्या अतीसुदूर भागात राहते, तरीही किराणा आणि वैद्यकीय साहित्याच्या रूपात मला मदत मिळाली. मी देवाकडे प्रार्थना करते की सर्व गरजूंना मदत करण्याचे सामर्थ्य तो आपणांस देवो.”

आधुनिक काळातल्या ‘अष्टलक्ष्मीच्या’ या आराधनेमध्ये सहभागी असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना अनेक लाभार्थ्यांनी अगदी मनापासून आशीर्वाद दिलेत. याहूनही अधिक कठोरतम कार्य करण्यासाठी, समाजाची अधिक मदत करण्यासाठी आणि परोपकाराच्या सेवा कार्याची आपली सनातन भारतीय परंपरा अशीच अबाधित राखण्यासाठी आम्ही ह्या आशीर्वादाचा नम्रपणे स्वीकार करत आहोत.


{{-- --}}