कोरोना महामारीच्या काळातही विवेकानंद सेवा मंडळाचा कार्यध्यास : शहापूरच्या आदिवासी शाळेला केले जलस्वयंपूर्ण!

शहापूर, २ जुलै २०२० : 'प्रतिकूल परिस्थितीत दडलेली संधी शोधून जटिल समस्यांचे निराकरण करणे' हा मंत्र, मंडळाच्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात काम करणाऱ्या टीमने निश्चयाने आचरला. त्याचे पूर्ण झालेले मूर्त रूप पाहून केवळ गावकऱ्यांनाच नाही तर आम्हां सर्वांनाही अतिशय आनंद झाला.

कोविड-१९ आपत्तीचा फटका प्रत्येक व्यक्ती आणि समाजघटकांना बसला आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या संघशक्तीमुळे मंडळ या आपत्तीत ४,७०० गरजूंना अन्नधान्याची मदत करू शकले. याच्या जोडीलाच विवेकानंदांच्या सेवा तत्त्वज्ञानाने प्रेरित होऊन मंडळाने इतर सेवाकार्येही सुरूच ठेवली होती.

राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या 'चिंध्याची वाडी' येथील आश्रमशाळेत मागील ७ वर्षांपासून दर्जेदार शिक्षण देण्याच्या कामात सहभागी असणाऱ्या मंडळाच्या टीमने, तेथील अजून एक जुनी अडचण दूर करण्याचे ठरवले. ती अडचण होती 'पाण्याचे दुर्भिक्ष्य'.

मंडळाने तज्ञांची टीम बनवली आणि सर्व परवानग्या व महत्त्वाच्या बाबींची पूर्तता करून आणि कोविड काळात उचित शारीरिक अंतरांचे भान राखून जलसंधारणाचे काम यशस्वी केले. प्रस्तुत करत आहोत त्या कामाचा आढावा:

  • चिंध्याची वाडी या वनवासी गावातील आश्रमशाळेतील पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न सोडविण्यासाठी जलसंपदा प्रकल्प हाती घेण्यात आला.
  • वर्षाकाठी १ कोटी लिटर पाणी वाचविण्याच्या उद्दिष्टाने सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पामध्ये पावसाळ्याआधीच ५५ लाख लिटर पाणी साठविण्याचे उद्दिष्ट साध्य झाले असून उर्वरित लक्ष्य पावसाळ्यानंतर गाठण्यात येणार आहे.
  • विसेम सेवा प्रकल्प टिमने अनेक अडथळ्यांवरती मात करून विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला.
  • राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या या आश्रमशाळेतील जलसंपदा प्रकल्पास आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपनी CGI ने पाठिंबा दिला तसेच OIKOS वॉटर मॅनेजमेंटकडून स्वयंपूर्ण जल व्यवस्थापन सोल्युशनचे सहकार्य लाभले.

दुर्भिक्ष्यातून मुबलकतेकडे

ही शाळा डोंगराळ भागात असल्याने पाणी साठवून ठेवणे जिकिरीचे काम होते. येथील ४००-४५० मुलांमागे फक्त २ बोअरवेल असल्याने मुलांना पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होत नव्हते. पाण्याच्या कमतरतेमुळे मुलांना वैयक्तिक स्वच्छता राखण्यातही अडचणी येत होत्या. बरेचदा स्वच्छ प्रसाधनगृहे नसल्याने विद्यार्थिनींचे पालक येथे प्रवेश घेऊ देत नव्हते.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना प्रातर्विधीसाठी खूप पायपीट करावी लागत असे. आठवड्यातून एकदा जवळच्या पाण्याच्या स्रोताकडे जाऊन कपडे धुवावे लागत असत. यात वेळेचा अपव्ययही होत होता आणि जोखिमही होती.

शाळा स्वतःच्या प्रयत्नांनी पाणी वाचवण्याचा प्रयत्न करीत होती पण ते प्रयत्न पुरेसे नव्हते. या दुर्भिक्ष्यावर मात करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज होती. प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची मंडळाची व्यवस्थापन कौशल्ये येथे कामी आली. कोविडच्या संकटाआधीच प्रकल्प सुरू झालेला असल्याने सर्व परवानग्या ३० मार्च पर्यंत मिळाल्या होत्या. परंतु तोपर्यंत टाळेबंदी सुरू झाली होती आणि प्रकल्प पुढे नेण्यात अनेक लहानमोठे अडथळे निर्माण झाले.

जलसंपदा प्रकल्प

CGI (CGI Information Systems and Management Consultant Pvt Ltd) ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नावाजलेली आंतरराष्ट्रीय कम्पनी. या कंपनीच्या भारतीय HELP CSR कार्यक्रमा अंतर्गत मंडळाच्या या शाळेसाठीच्या शैक्षणिक व आरोग्य उपक्रमांना २०१९ पासून साहाय्य करत होतीच. HELP कार्यक्रमाच्या उदघाटना दरम्यान CGI च्या नेतृत्व टीमने या गावाला भेट दिली होती तेव्हा त्यांना येथील पाण्याची अडचण दूर करण्याची गरज वाटली, आणि त्यांनी राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित या आश्रमशाळेत, मंडळाच्या जलसंपदा उपक्रमास साहाय्य करण्याचा निर्णय घेतला. मंडळावर विश्वास दाखवून या कार्याला निधी पुरविण्याचे त्यांनी मान्य केले याबद्दल आम्ही मंडळातर्फे CGI च्या सर्व संबंधित टीम चे आभारी आहोत. CGI साठी CSR म्हणजे निव्वळ कॉर्पोरेट सिटिझनशिप नसून ते त्यांचे जगण्याचे एक महत्वाचे मूल्यच आहे.

मंडळाने या क्षेत्रातील तज्ञांची तुकडी तयार केली. OIKOS Water Management Pvt. Ltd. चे संचालक आणि जलसंधारण क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. उमेश मुंडल्ये यांनी जलवृद्धी करणाऱ्या सिस्टिम्सचा आराखडा, खरेदी आणि सर्व यंत्रणा निर्मिती करण्याची तयारी दर्शवली.

वास्तूविशारद आणि नंतर प्रकल्प सल्लागार म्हणून काम करणाऱ्या निखिल चौधरी यांचा यात 'प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार' म्हणून समावेश झाला. मंडळाचे सचिव विनोद देशपांडे यांनी प्रकल्प समन्वयक म्हणून काम पाहिले. या सेवा प्रकल्पात CGI कंपनीची CSR टीम सुरुवातीपासून सामील होती व उपाययोजनेच्या तत्परतेविषयी निर्णयप्रक्रियेत त्यांनी सल्लामसलत केली.

विनोद देशपांडे यांनी या प्रकल्पाची उद्दिष्टे सांगताना नमूद केले की, “आपले उद्दिष्ट १ करोड लिटर पाणी साठवण्याचे आहे, त्यापैकी ५५ लाख लिटर जलसंधारणाचा टप्पा आपण पूर्ण केला आहे, आणि दुसऱ्या टप्प्यात ऑक्टोबरपासून गरजेनुसार जलव्यवस्थापन तंत्रे वापरून वृक्षसंवर्धनाच्या आणि जैविक माध्यमातून ४५ लाख लिटर पाणी जमिनीत मुरवून साठवण्याचे आपले उद्दिष्ट आहे.”

डॉ. मुंडल्ये यांनी शाळेच्या परिसराचे तपशीलवार सर्वेक्षण केले आणि उपाय सुचवले. त्यापैकी एक म्हणजे छता वरील रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टमद्वारे विद्यमान 2 बोअरवेलची भरपाई करण्यासाठी कृत्रिम रिचार्जिंग तंत्र वापरणे. जमिनीखालील पाण्याच्या नैसर्गिक झऱ्यांच्या माध्यमातून पुनरुज्जीवित करणे यांचाही समावेश शिफारशीत होता.

या भागात पावसाचे प्रमाण चांगले असूनही उतार आणि कठीण कातळ भूभाग असल्याने पाणी वाहून जाते. यासाठी आता छताचा वापर करून शास्त्रीय पद्धतीने हे पाणी साठवण्यात येत आहे. याबाबत बोलताना डॉ. मुंडल्ये यांनी सांगितले की, “पावसाचे पाणी साठवून आणि बोअरवेल्सचे पुनरुज्जीवन करून २२ लाख लिटर पाणी साठवण्यात आम्हाला यश आले आहे. २ बोअरवेल्सच्या पुनरुज्जीवनाचे कार्य पूर्ण झाले असून, तिसऱ्याची तरतूद करण्यात आली आहे."

डॉ. मुंडल्ये यांनी दुसऱ्या उपायाबद्दल सांगितले की, “यामध्ये विहिरीपासून १०० मीटरवर एक भूमिगत बंधारा (छोटा अडसर किंवा कमी उंचीची एक भिंत- १० X ८२ X १ फूट मापाची) बांधण्यात आला आहे. यामुळे जमिनीखाली नैसर्गिक झऱ्यांच्या माध्यमातून विहिरीला आणखी ३० लाख लिटर पाण्याचा पुरवठा होईल.”

मंडळाकडून पर्जन्यपातळीचे मापन करून पाण्याचा वापर आणि उपलब्धता यातील तफावत यांचा विचार केला जाईल. पर्जन्यमापक बसवून अचूक माहिती गोळा केली जाईल.

आव्हाने

या उपक्रमात अनेक आव्हानांना हे पथक सामोरे गेले. कोविड काळात कामगार आणि संसाधने यांची उपलब्धता ही मोठी अडचण होती. दुसरी अडचण म्हणजे सामानाच्या वाहतुकीतील वेळेचा अपव्यय. कामगारांचा तुटवडा असल्याने कुशल कामगार मिळणे खर्चिक झाले होते.

याशिवाय चिंध्याची वाडी ते डोंबिवली अंतर जवळपास १०० किमी असल्याने पथक तेथपर्यंत पोहोचणे मुश्किल होते. सुदैवाने ग्रामपंचायतीने काम करण्याची परवानगी दिली आणि त्यामुळे प्रवासासाठी परवाने मिळू शकले. शाळा गावाच्या बाहेर असल्याने गावकऱ्यांनीही कामासाठी साहाय्य केले.

दुसरे आव्हान म्हणजे निसर्ग चक्रीवादळाने लवकर आलेला पाऊस, ज्यामुळे कामात अडथळे आले. जमिनीखालील बंधाऱ्याच्या कामाची जागा एका शेतकऱ्यांची होती आणि पाऊस सुरू होत असल्याने त्यांना सिंचनासाठी जमीन परत हवी होती त्यामुळे दोन दिवसात ते काम पूर्ण करून जमीन त्यांना परत करण्यात आली.

एक अनपेक्षित आव्हान म्हणजे एका जमिनीच्या पट्ट्यातील पातळीत तफावत होती. पूर्वी मापन केलेले असताना असलेली पातळी शेतकऱ्यांनी नंतर जमीन सपाट केल्यामुळे बदलली गेली होती. त्यामुळे सर्व मापे परत त्यानुसार बदलावी लागली. परंतु टीमच्या निर्धाराने हेही काम कमी कालावधीतच पूर्ण झाले.

“अडथळ्यांतून मार्ग काढून सतत मार्गक्रमण करत राहायचे” या तत्वाने याही कामातील सर्व आव्हाने परतवून लावून काम पूर्ण झाले. या कामामुळे शाळेच्या परिसरात पाणी ३-४ महिने अधिक टिकू शकेल. म्हणजे साधारणत: पुढील उन्हाळी महिन्यांसाठीसुद्धा पाणी मिळू शकेल. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मुलांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर आता तोडगा मिळाला आहे.

अपेक्षित फलित-

विद्यार्थ्यांचा जो वेळ पाणी आणण्यासाठी पायपीट करत वाया जात असे, त्याचा सदुपयोग करून ते आता अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील, अशी आशा या जलसंपदा प्रकल्पामुळे पल्लवित झाली आहे. विवेकानंद सेवा मंडळास परत एकदा या आव्हानात्मक कोविड काळातही समस्या सोडविण्यात यश प्राप्त झाल्याचा आनंद प्रत्येक कार्यकर्त्यासाठी मौल्यवान आहे !


{{-- --}}