"हृदय आणि मेंदूच्या वादात हृदयाचे म्हणणे ऐका", अशी स्वामी विवेकानंदांनी दिलेली शिकवण, मंडळाचे कार्यकर्ते अंगीकारत चाललेले दिसत आहेत. जव्हार, मोखाडा, पालघर आणि कर्जत या आदिवासीबहुल भागातील गरजू कुटुबांना मदत करताना, आमच्या कार्यकर्त्यांनी अंतःकरणाची साद ऐकून, चाकोरीतून बाहेर पडत आपल्या कक्षा अधिक व्यापक केल्या.
कर्जत तालुक्यामधील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या भिवपुरी, पाली, नेवाळे आणि मालेगाव या दुर्गम खेड्यात धान्यपाकिटांचे वितरण करण्यास विसेम कार्यकर्त्यांनी मदत केली. या स्थानबद्धतेमुळे अन्न धान्य आणि किराणा खरेदी करण्यास असमर्थ ठरलेल्या, अपंग आणि जेष्ठ नागरीकांचा समावेश असलेल्या २३ कुटुंबांपर्यंत, एका स्थानिक सरकारी अधिकाऱ्याच्या मदतीने आपण मदत पोहोचविण्यात यशस्वी झालो .
वरील दुर्गम भागात गेल्या दोन महिन्यांपासून सर्व शासकीय तसेच एमआयडीसीशी संबंधित कामे बंद असल्याने उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. तसेच गेल्या शेतीचा हंगामात कोणतंच पीक घेता न आल्याने या वनवासी बांधवांवर दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत पडली होती. काही कुटुंबामध्ये १०-१५ सदस्य असल्याने येथील परिस्थती अजूनच भीषण झाली.
मंडळाच्या या मदतीबद्दल बोलताना पालघर येथील स्थानिक कीर्तनकार आणि अध्यात्म विचार प्रबोधिनी सामाजिक संस्थेचे श्री. हरिशचंद्र कुवरा यांनी सांगितले की, "काही गावकरी माझ्या संपर्कात आले आणि त्यांनी त्यांच्या या परिस्थितीबद्दल मला अवगत केल्यावर मी लगेच विवेकानंद सेवा मंडळ, डोंबिवली यांच्याशी संपर्क साधला. ते त्वरित आमच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी ७० कुटुंबाना १५ दिवस पुरेल एवढी शिधा सामुग्री देताना आम्हांला आश्वस्त केले कि या पुढे कधीही मदतीची गरज भासल्यास ते सदैव मदतीस तत्पर असतील !'
आजही यापैकी अनेक गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज ३ ते ४ किलोमीटरची पायपीट करावी लागते. स्वतः श्री. कुवरा अतिदुर्गम भागातील या वनवासी बांधवांपर्यंत अन्नधान्य आणि किराणा मदत थैलींचे वाटप करण्यासाठी दररोज १००-१५० किलोमीटरचा प्रवास करीत आहेत. कुवराजीं सारखं सेवाभावी कार्य करण्यासाठी सिंहाचं काळीज असावं लागतं !
सर्व सावधानता पाळून आणि वैयक्तिक सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करून श्री. हरीशचंद्र कुवरा व त्यांचे स्वयंसेवक अन्नधान्यांच्या थैलीचे वितरण करतात. अन्नधान्य रुपी मदत घेताना, "या संकटात अगदी देवासारखे धावून आलात" असे सांगताना त्यां वनवासी बांधवांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
या गरजू वनवासी बांधवांच्या अन्न धान्य आणि किरणाची व्यवस्था पाहणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून जेव्हा समजलं कि त्या वनवासी बांधवांमधील काही जणांकडे शासनमान्य ओळखपत्र किंवा साधा मोबाईल फोन सुद्धा नसल्याने त्यांच्या पर्यंत पोहोचणे आणि सत्यता पडताळणी मध्ये अडथळा येत आहे तेव्हा मग आम्ही श्री.कुवारा यांना त्या गरजू बांधवांच्या नावांची यादी आणि त्यांचे फोटो पाठविण्याची विनंती केली.
त्या पुढील समस्या होती ती अन्नधान्य संपादन करणे आणि त्याच बरोबर त्या अतिदुर्गम भागात असे किराणा दुकान शोधणे जे भीम किंवा अन्य डिजिटल पेमेंट अंतर्गत देणे स्विकारण्यास समर्थ असेल. यावेळी पुन्हा एक समविचारी दुकानदार आमच्या मदतीस धावून आला. जवळच्या भागातील एका दुकानात सर्व कुटूंबांसाठी धान्यपाकिटे तयार केली गेली आणि मंडळाने त्वरित त्यांचे देणे चुकविले.
कुवराजींनी अगदी बरोबर सांगितले, की वनवासी बांधवांचे आशीर्वाद म्हणजे आम्हाला सर्वांना मिळालेले सर्वात मोठे यश आहे! लोकांना हेरणे किंवा शोधणे आह्वानात्मक असल्याचे कळल्यावर 'विसेमं' च्या कार्यकर्त्यांनी माघार न घेता, सध्याच्या नियमांत बदल करत, त्यांना शोधण्याचे नवीन मार्ग शोधून काढले. कार्यकर्त्यांनी अंतःकरणाची साद ऐकून, कोणतेही आढेवेढे न घेता गरजूंना मदत केली, आणि सर्व संबंधित व्यक्तींसाठी हे समाधान मोठे आहे !