संघर्षामध्ये विश्वासाचा विजय आणि भीती पराभूत !

"डामडौल आणि हव्यास यांना अवाढव्य रूप आलं असलं तरीही, सभ्य आणि हळूवार माणसांच्या शेकोट्या पाहण्यासाठी काही फारसे दूरवर शोधावे लागत नाही."
- गॅरीसन कीलर.

डोंबिवलीजवळच्या वडवली गावातील दिव्यांग कुटुंबांना याचाच अनुभव आला. निमित्त झालं, विवेकानंद सेवा मंडळ (विसेमं) व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (रा.स्व.संघ) यांच्याकडून अगदी वेळेवर पोहोचलेल्या मदतीचं !

वडवली गावातील दिव्यांग कुटुंबांची सेवा करताना 'विसेमं'च्या आम्हा कार्यकर्त्यांना अतिशय हृद्य अनुभव आला.

यापैकी एका कुटुंबाचा एकुलता एक कमावता हात असणाऱ्या दिनेश बोरसे (नाव बदललं आहे) याला काही महिन्यांपूर्वी पूर्ण अंधत्व आलं. मूळची दृष्टी व्यवस्थित असूनही कसल्यातरी संसर्गामुळे त्याची दृष्टी गेली. त्यामुळे शेती करणं अशक्य झालं. कुठूनतरी या कुटुंबाला रास्वसंघाच्या आणि आमच्या मदतकार्याची माहिती मिळाली, आणि ते आमच्यापर्यंत पोहोचले.

बोरसे कुटुंबाबरोबर, त्या भागात एकूण तीन कुटुंबांना मदतीची गरज होती. या लोकांकडे फारतर जमिनीचा लहानसा तुकडा होता, पण सध्याच्या परिस्थितीत जमिनीची केवळ मालकी असणं पुरेसं नव्हतं.

त्यांनी संपर्क साधल्यावर, आम्ही त्यांना नेहमीप्रमाणे काही प्रश्न विचारले.. "काय मदत हवी आहे? तुम्हाला काय काय लागतं?.." वगैरे. त्यांच्याबद्दल आणखी माहिती मिळवण्यासाठी आम्ही त्यांच्या एका समन्वयकाची भेट घेतली. थोडक्यात सांगायचं तर, तिन्ही कुटुंबांत कमावत्या व्यक्ती दिव्यांग आहेत. त्यापैकी दोघे अंध आहेत, तर एकाला केवळ एकच पाय आहे.

त्या पूर्ण भागातच अन्नधान्य आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळण्यात अडचणी येत होत्या. लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात या कुटुंबांना सरकारकडून मदत मिळाली, पण कालांतराने त्या वस्तू संपल्या.

ही सर्व वस्तुस्थिती पडताळून पाहिल्यावर, त्यांची सेवा करण्याचं आम्ही निश्चित केलं. या सगळ्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी अगदी अंतःकरणापासून आम्हाला धन्यवाद दिले.

या पॅकेजमध्ये डाळ-तांदूळ याबरोबर रोजच्या स्वयंपाकात लागणाऱ्या कांदे-बटाटे-मसाले याही गोष्टी असल्याने ते पॅकेज परिपूर्ण होतं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. संपूर्ण कुटुंबाला उपयोगी पडेल अशा विचाराने अभ्यासपूर्वक तयार केलेली ती यादी होती. सामान्यपणे, सेवाभावी संस्था सहसा धान्यं किंवा डाळी अशा दोनच वस्तू देतात. मात्र आम्ही त्यांना मिठापासून बटाट्यापर्यंत सर्व गरजा भागवणारं सामान पुरवलं.

त्यामुळे, मानवतेवरचा त्यांचा विश्वास आणखी भक्कम होत जिंकला, तर जगण्याची भीती दूर झाली. आणि या क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला मिळालं !


{{-- --}}