कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व देश स्थानबद्धतेत आहे. स्वतः घरात राहून रोगप्रसार थांबवायची जबाबदारी आपल्यापैकी प्रत्येकावर आहे. आणि आपण सर्व ती अगदी चोख बजावतो आहोत. आपल्या कुटूंबासोबत निरनिराळे पक्वान्नांचा आस्वाद घेत असताना ज्यांना रोजच्या घासाची भ्रांत पडली आहे, त्या आपल्या देशबांधवांच्या विचाराने आपलाही घास अडकत असल्याचा अनुभव आपण सर्वच जण घेत आहोत. सरकार आणि प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत अगदी युद्धपातळीवर सूरु आहे परंतु संकटच एवढं मोठं आहे की सर्वांपर्यंत मदत पोहोचणे कठीण होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी, स्वामी विवेकानंदांच्या 'सेवा' तत्वाने प्रेरित होऊन, आपल्या विवेकानंद सेवा मंडळाने (विसेम) खारीचा वाटा उचलला आहे, हे कळविताना समाधान वाटते.



राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या वाराणसी स्थित 'सेवागाथा' संकेतस्थळाच्या संपादिका सौ.विजयालक्ष्मी सिंह यांच्या कल्पनेतून मुर्तरुपास आलेल्या 'कोरोना टास्क फोर्स' च्या सेवाभावी कार्यकर्त्यांकडून चालविण्यात येणाऱ्या 'नॅशनल हंगर हेल्पलाईन' च्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रीय स्थानबद्धतेच्या नियमांमुळे अडकलेल्या ७,००० हुन अधिक असंघटित मजूरांना मदत करण्यात आली आहे. या सर्व मजुरांमध्ये एक सामायिक दुवा होता तो हा की, स्थलांतरीत असल्याने यांच्यापैकी कुणाकडेच रेशन कार्ड नव्हते. देशभरातल्या अशा अनेक स्थलांतरीत असंघटित मजुरांपर्यंत अन्नधान्य आणि किराणाची मदत पोहचविण्यासाठी विजयालक्ष्मीजींनी भारतातील अनेक स्वयंसेवक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला.
या हेल्पलाईन मार्फत ठाणे, पुणे आणि मुंबई जिल्ह्यातून येणाऱ्या मदतीच्या हाकेस धावून जाऊन त्यांस धान्य आणि किराणा पोहचविण्याची जबाबदारी विसेम कडे सोपविण्यात आली. हेल्पलाईनच्या या कार्यात साहाय्य करताना, स्थानबद्धतेचे सर्व नियम आणि सूचनांचे पालन करून मंडळाने त्या गरजू देशबांधवांना मदतीचा हात देऊन कुणीही उपाशी राहणार नाही याची खात्री केली.
तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आणि स्थानबद्धतेचे सर्व नियम पाळून, 17 मे 2020 संध्याकाळी 04:00 वाजेपर्यंत एकूण 2030 देशबांधवांपर्यंत, ज्यामध्ये 304 महिला आणि 771 मुले आहेत, मदत पोहचविण्यात मंडळास यश आले आहे.

आणि हे सांगण्यास आपल्याला अभिमान वाटतो की या आधीही कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील आश्रमशाळेतील अनाथ आणि बेघर अशा १२९ मुलांना (Click here to read this story ) तसेच कल्याण जवळील 'वसार' येथील अडकून पडलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या ४४ विद्यार्थ्यांना महिन्याभराचे धान्य आणि किराणा देऊन आपण मदत केली आहे. (Click here to read this story ). या राष्ट्रीय स्थानबद्धतेच्या काळात मुंबईतील विक्रोळी भागातील २० कुटुंबांना महिन्याला पुरेल एवढे; साधारण १८ किलो प्रति कुटुंब धान्य आणि किराणा सामान मंडळाने पुरविले. धान्य व किराणा मालाच्या वितरणाची ही प्रक्रिया उत्कृष्ठ तऱ्हेने कार्यान्वित करण्याकरिता विसेम च्या बरोबरीने सहकारी धान्य भांडार, शिवाजी महाराष्ट्र अमेरिका परिवार फाऊंडेशन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) या तीन संस्था सुद्धा कार्यरत होत्या. (Click here to read this story ) . तसेच डोंबिवली जवळील वडवली गावातील तीन दिव्यांग कुटुंबातील ३२ जणांना गरजेपुरते अन्नधान्य व नेहमीच्या जेवणाकरिता किराणा मालाची सुद्धा मदत करण्यात आली. (Click here to read this story )
गरजूंची प्राथमिक स्वरूपाची सत्यता पडताळणी 'हेल्पलाईन' कडून करण्यात येते. त्यानंतर मंडळाचा समन्वयक त्या मागणीस अनुक्रमांक देऊन प्रत्यक्ष विसेम कार्यकर्त्याकडे वर्ग करतो जो पुढे जाऊन मागणीची अजून एकदा सत्यता पडताळून सर्व अपेक्षित माहिती विसेमच्या माहिती संकलन सूचीप्रमाणे एकत्रित करतो. डोंबिवली, ठाणे, मुंबई आणि पुणे क्षेत्रामधील गरजूंच्या मागणीस प्रतिसाद देताना स्थानबद्धतेच्या नियमांचे कटाक्षाने पालन करून सर्व आर्थिक व्यवहार हे डिजिटल स्वरुपात केले जातात. गरजूंची खरी ओळख पटविण्यासाठी त्यांचे ओळखपत्र (आधारकार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र ई.) मागविण्यात येते. प्रसंगी Google Maps च्या मदतीने गरजूंच्या ठिकाणाची सत्यता तसेच जवळील किराणा दुकाना पर्यंत त्यांना पोहचविण्यात येते. गरजूंच्या कुटुंबाची सर्व माहिती घेऊन वेळेप्रसंगी video call च्या माध्यमातून त्यांच्या कौटुंबिक अवस्थेची सत्यता पडताळणी करण्यात येते. आता पर्यंत आपण मदत केलेल्या पैकी ९९% लोकांना खरंच मदतीची आवश्यकता असल्याचे आढळून आले आहे. विसेम कार्यकर्त्यांमार्फत गरजूंना दैनंदिन गरजेच्या पूरक अशा ठराविक वस्तूंची एक यादी पाठविण्यात येते. गरजूंना जवळील किराणा दुकानातून सामानाच्या खरेदी अंती दुकानदाराकडून इ-बिल मागण्यास सांगण्यात येते. आता पर्यंतच्या सर्व खरेदीचे देणी ही UPI-BHIM मार्फत चुकविण्यात आली आहेत.
आपल्या कडे मदतीसाठी येणाऱ्या गरजूंमध्ये अनेक जण हे असंघटित स्थलांतरीत कामगार, अल्प मानधनावर काम करणारे प्लम्बर, घरकाम करणारे, फेरीवाले असतात. हे बांधव दररोज मिळणाऱ्या मानधनावर आपल्या गरजा भागवतात कारण यांची बचतठेव नसते. मंडळाने या संकटसमयी एका कुटुंबाला १५ दिवस पुरेल एवढ्या धान्य आणि किरणाची 'मदत थैली' तयार केली असून त्यापेक्षाही जास्त अथवा वेगळी गरज असलेल्या मागणीचा सुद्धा मंडळ पुरवठा करीत आहे.
जसे की एका वयोवृद्ध महिलेच्या मधुमेहाच्या औषधांची गरज, गर्भवती महिलेच्या खास diet ची मागणीपासून ते काही मुलांसाठी बिस्कीट सुद्धा मंडळ पुरवीत आहे. एखाद्याच्या पहिल्या वेळच्या मागणीचा पुरावठा केल्यानंतर सुद्धा जर ते दुसऱ्यांदा मदतीसाठी आले असता आपण सर्व सत्यता पडताळणी करून त्यांस मदत करीत आहोत. स्थानबद्धतेच्या या वाढत्या काळात सरकार आणि प्रशासनाच्या सर्व नियम आणि सूचनांचे कटेकोररीत्या पालन करून आपण हे मदतकार्य करीत आहोत. या वैश्विक संकटात आपण आपल्या देशबांधवांवर दाखविलेला विश्वास ते सार्थ ठरवीत आहेत हे निश्चितच आपले सेवा कार्य योग्य ठिकाणी पोहचत असल्याची पावतीच आहे.
ज्या लोकांना आम्ही मदत केली, त्यांनी मंडळाचे मनःपूर्वक आभार मानले. खोपोली येथील भोकर पाड्यामधील कुटुंबांनी आपल्या आनंदाश्रूना वाट करून देताना, आमच्या जवळच्या नातेवाईकांकडून सुद्धा अशी मदत होऊ शकली नसती असे उद्गार काढले. मदतीचा हात देणाऱ्या त्या स्वयंसेवकांमध्ये त्यांनी देवदूत पाहिले. ही स्वयंसेवा करणाऱ्या आपल्या या कार्यकर्त्यांना मदतीच्या या प्रक्रियेमध्ये एक नाविन्यपूर्ण अनुभूती अनुभवायला मिळाली. एका प्रसंगी एके दुपारी तर आपल्याकडे ३ मुलं असलेलं कुटुंब मदतीसाठी आले असता आपल्या निदर्शनास आले की त्यांच्याकडे केवळ एका वेळच्या जेवणाचीच सोय होईल एवढेच धान्य शिल्लक आहे. आपण फक्त १२ तासांत त्या गरजू कुटुंबाला पुरेसे धान्य त्याच्या घरी पोहचविण्यास यशस्वी झालो तेव्हा 'अत्यंत निकडीच्या क्षणी आपण आमची गरज पूर्ण केलीत' या शब्दांत त्यांनी आपले आभार मानले.
पुणे शहरातील एका छोटयाशा गावांत आम्हांला किराणा दुकानदारास Digital पेयमेंट करण्यास तांत्रिक अडचणी आल्या असता आमच्या स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन स्वतः त्या दुकानाचे देणे दिले. आजपर्यंत ठाणे जिल्ह्यातील एकंदर 1422 लोकांना तसेच मुंबईतील 500 लोकांना, ज्यामध्ये विरार, मिरारोड, दानाबंदर हे विभाग येतात आणि पुण्यातील 39 लोकांना पंधरवड्याचे धान्य व किराणा यांचा पुरवठा केला. तसेच रायगड जिल्ह्यातील २६ जणांना, अहमदाबाद येथील ८ लोकांना आणि औरंगाबाद मधील 6 व्यक्ती पर्यंत आपण तातडीने धान्य आणि किरणाची मदत पोहचविण्यात आपण यशस्वी झालोत. आम्ही येथे हे देखील सांगू इच्छितो की उत्तर गोवा जिल्ह्यातील एका संस्कृत शाळेच्या २२ विद्यार्थ्यांना १५ दिवस पुरेल इतकी सर्व आवश्यक किराणा सामग्री पुरविण्यात आली. या सर्वांचे पैसे धान्य व किराणा व्यापाऱ्यांना मंडळाने भीम UPI द्वारे पोहचते केले.

विसेमं चा देणगीदार समुदाय कोणत्याही प्रकल्पात नेहमी आमच्या बरोबर असतो आणि त्यांनी गरजू व्यक्तींना किराणा पुरवठा करण्याच्या या कार्यासही मनापासून समर्थन दिले आहे.
विवेकानंद सेवा मंडळ हे आपल्या 'सेवा' या ध्येयाशी/तत्वाशी एकनिष्ठ असून संपूर्ण राष्ट्रीय स्थानबद्धतेच्या काळात जास्तीत जास्त गरजूंना यथाशक्ती मदत करण्यास बांधील आहे आणि आगामी काळात अशी मदत आम्ही सुरूच ठेऊ कारण आम्हांला या राष्ट्रकार्याचा सार्थ अभिमान आहे !