विवेकानंद सेवा मंडळाच्या "गरजवंतांना अन्न मोहीमेचे" सहस्रक पूर्ण !

शनिवार ९ मे, २०२०: भुकेल्या जीवांना आश्वस्त करताना १००० जणांच्या मदतीचा टप्पा पार !

ध्येयसिद्धीच्या या अत्युच्च आनंदाच्या क्षणाला विवेकानंद सेवा मंडळाच्या (विसेम) कार्यकर्त्यांच्या भावनांचा जणू काही बांध फुटला !

१३ एप्रिल २०२० रोजी रबाळे, नवी मुंबई येथील कुटुंबातील तिघांना या कठीण काळात अन्नधान्य आणि किराणाची मदत पोहोचवून आपण या सेवादानयज्ञाला सुरुवात केली. त्या एका मदतीनंतर आपण मागे वळून पाहिलेच नाही. विसेम च्या सर्व कार्यकर्त्यांनी मग ते कोणत्याही वयाचे असोत, त्यांनी या थोर सेवा कार्याला कोणतीही वैयक्तिक अपेक्षा न ठेवता स्वतःला वाहून घेतले. 'थेंबे थेंबे तळे साचे' या युक्तीप्रमाणे, या मोहिमेतील अगदी छोट्यातील छोटी मदत सुद्धा या सेवा कार्याला अधिक बळकटी आणत गेली. आतापर्यंतच्या आमच्या प्रवासाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

धान्य, किराणा, औषधे अगदी नवजात अर्भकासाठी दूध, गर्भवती महिलेसाठी औषधे इत्यादींच्या मदतींचा पुरवठा करण्यासाठी काही अवधीतच मंडळातील कार्यकर्त्यांची फौजच उभी राहिली. त्यांच्या प्रयत्नांना चेतना देण्याची भूमिका काही समन्वयकांनी चोखपणे पार पाडली. अनेक कार्यकर्ते विविध केसेसमध्ये सत्यता पडताळणी व त्यांना धान्य किरणाची मदत पोहोचविण्यासाठी नियुक्त करण्यात आले. मदतीचा हा ओघ व्यवस्थित कार्यरत राहण्याकरिता मानक कार्यप्रणाली गुगल फॉर्म्स द्वारे कार्यान्वित करण्यात आली. त्यानंतर काही मदतीस उत्सुक आणि सक्रिय आश्रयदाते/देणगीदार या महान कार्यासाठी आपले योगदान देण्याकरिता पुढे आले. आमच्या या प्रयत्नांना बळ देण्याकरिता काही समविचारी संस्थाही पुढे आल्या. आमच्या या विधायक कार्यामध्ये आमचे काही मित्र, सहकारी त्यांच्या कामाच्या व्यापातून एकतर स्वयंसेवक किंवा देणगीदार म्हणून मदत करते झाले. हे कार्य अविरत आणि निर्धोक सुरू राहावे यासाठी मंडळातील काही स्वयंसेवक जे सनदी लेखापाल, हिशेबनिस, लेखक, सामाजिक माध्यमांचे ज्ञान बाळगणाऱ्यांनी खूप मेहनत घेतली. आम्हीं सर्वजण एकत्रपणे आपल्या भारतीय बंधू भगिनींना त्यांच्या अडचणीच्या काळांत मदत करू शकलो आणि परिस्थिती नियंत्रणात येई पर्यंत हे काम सातत्याने करीत राहू.

या काळात आम्हां कार्यकर्त्यांना विसेम च्या संस्थापकां पैकी प्रा.सुरेश नाखरे यांनी १५ वर्षांपूर्वी पाठवलेल्या पत्राची आठवण येते. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, 'आजच्या काळात जेथे लोकं दुसऱ्यांच्या कार्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतांत, तिथे हा कार्यकर्त्यांचा गट आपल्या कार्याचे श्रेय दुसऱ्याला देण्याच्या प्रयत्नांत दिसत आहे. ' या काळात शहराच्या, राज्यांच्या, जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात वसलेल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केस नियुक्त करण्यापासून ते दुकानदारास पैसे पोहोचविण्या पर्यंत व गरजूंच्या हातात मदत मिळेपर्यंत संपूर्ण काम सातत्याने केले आहे. आम्हांला पुनःश्च येथे नमूद करावेसे वाटते की, श्री नाखरे सरांनी सांगितल्याप्रमाणे 'मीच हे कार्य का करावे? किंवा 'त्याची गरज काय' असे प्रश्न या कार्यकर्त्यांनी कधीच उपस्थित केले नाहीत. कार्यकर्त्यास एखादे कार्य नेमून दिले की तो मनांत कोणताच किंतु न आणता पूर्ण समर्पणभावाने ते कार्य पूर्णत्वास नेतो.

स्वामी विवेकानंद म्हणतात "जे जे उत्तम सद्गुण दुसऱ्यांच्या अंगी आहेत, ते स्वतःमध्ये आणून शक्य तसे आत्मसात करा; दुसऱ्याची प्रतिकृती बनू नका !". या मदत कार्याच्या निमित्ताने कार्यकर्ते एकमेकांकडून अनेक उत्तम गुण आत्मसात करून आपल्या एकूण व्यक्तिमत्त्वात एक सकारात्मक बदल घडवीत आहेत. आपल्या सेवा कार्यात, त्या गरजवंतांची स्वतःच्या घासातील एक घास दुसऱ्याला देण्याची वृत्ती आम्हां कार्यकर्त्यांना खूप काही शिकवून जात आहे. या कोरोना साथीत आपण महाराष्ट्रासहित गोवा, गुजरात आणि मध्यप्रदेश मधील आपल्या बांधवाना मदत पोहोचविण्यात यशस्वी ठरलो आहोत.

ज्याप्रमाणे रामायणामध्ये वानर सेनेने सर्वांना एकत्र घेऊन श्रीराम नामाच्या जयघोषात अथांग सागरात सेतू उभा केला त्याप्रमाणेच आपण सर्व भारतीय एकजुटीने या कोव्हीड-१९ च्या मगरमिठीतून आपल्या देशास मुक्त करू शकू. या कोव्हीड-१९ च्या जीवघेण्या साथीत परिस्थितीने गांजलेल्या आपल्या भारतीय बांधवांपर्यंत मदतीचा हात पोहचविण्याच्या या महासेवा यज्ञात आपला हा खारीचा वाटा आहे.

थोर भारतीय उद्योजक श्री. रतन टाटा म्हणतात की, "जर तुम्ही वेगाने चालू इच्छिता तर एकटे चाला. पण जर तुम्ही दूरवर चालू इच्छिता तर सर्वांना एकत्र घेऊन चाला !". अगदी याच उक्तीप्रमाणे या संकटकाळात आम्ही सर्वजण मनांत सकारात्मक विचार घेऊन जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत सेवा पोहोचविण्यासाठी कटिबद्ध आहोत !

१३ एप्रिल २०२० रोजी रबाळे, नवी मुंबई येथील कुटुंबातील तिघांना या कठीण काळात अन्नधान्य आणि किराणाची मदत पोहोचवून आपण या सेवादानयज्ञाला सुरुवात केली. त्या एका मदतीनंतर आपण मागे वळून पाहिलेच नाही. विसेम च्या सर्व कार्यकर्त्यांनी मग ते कोणत्याही वयाचे असोत, त्यांनी या थोर सेवा कार्याला कोणतीही वैयक्तिक अपेक्षा न ठेवता स्वतःला वाहून घेतले. 'थेंबे थेंबे तळे साचे' या युक्तीप्रमाणे, या मोहिमेतील अगदी छोट्यातील छोटी मदत सुद्धा या सेवा कार्याला अधिक बळकटी आणत गेली.


{{-- --}}